वाचक लिहितात   

पाकिस्तानला चोख उत्तर द्या
 
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २५ निरपराध पर्यटकांची गोळ्या घालून निर्दयपणे हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पंतप्रधानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याने अकलेचे तारे तोडत त्यांच्या पूर्वसुरींप्रमाणे या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे म्हटले. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कायमची अद्दल घडवली पाहिजे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   
 
पाकिस्तानची कोंडी
 
काश्मिरची वाटचाल परत एकदा नंदनवनाच्या दिशेने सुरु झाल्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला असतानाच पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली. काश्मिरमध्ये जनजीवन सुरळीत होणे आणि पर्यटन वाढणे हेच मुळी पाक दहशतवाद्यांच्या पचनी पडलेले नसावे आणि त्यातूनच हा हल्ला झाला. निशस्त्र पर्यटकांवर एके४७ चालवताना धर्माची विचारणा करणे यातून त्यांचा नापाक इरादा स्पष्ट झाला. अंदाधुंद गोळीबारातून त्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांचा शोध घेऊन त्यांना थेट यमसदनी धाडणे हीच दुर्दैवी मृत पर्यटकांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरा थांबवून माघारी फिरुन युद्धपातळीवर महत्त्वाचे निर्णय घेऊन पाकिस्तानची सर्व स्तरावर नाकेबंदी करण्याची जी भूमिका घेतली आहे ती योग्यच आहे. अशा वेळी विरोधी पक्षानेही या घटनेचे राजकारण न करता केंद्र सरकारसोबत राहणे गरजेचे आहे.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
दहशतवाद संपवा
 
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा निषेधार्हच आहे. पर्यटकांवर झालेला हा हल्ला म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे. जगात भारताची ओळख ही शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे. भारताने कधीच कोणत्या देशाच्या कुरापती काढल्या नाहीत. शेजारी देशांशी मैत्रीचे शांततापूर्ण संबंध राहावेत अशीच भारताची भूमिका राहिली आहे. म्हणूनच भारताने कायम संयम राखला आहे. आता मात्र या संयमाचा अंत होऊ लागला आहे. भारताशी समोरासमोर युद्ध करण्याची पात्रता नसल्याने पाकिस्तान अतिरेक्यांच्या मदतीने असे भ्याड हल्ले घडवून आणतो. आपण मात्र नेहमीप्रमाणे निषेध व्यक्त करतो; पण आता केवळ निषेध व्यक्त करून थांबणे योग्य नाही. या भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर देऊन भारताने अतिरेक्यांचे कंबरडे मोडायला हवे. दहशतवाद्यांना मदत करणार्‍या पाकिस्तान सारख्या देशाची कोंडी केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
पाकिस्तानला धडा शिकवा
 
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकाकुल आहे. या हल्ल्यात पुण्यातील काही नागरिकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही निषेध होत आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवरून त्यांनी बोध घेतला नाही. तहव्वूर राणाच्या अटकेने जळफळाट झालेल्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची योग्य वेळ आली आहे. केंद्र सरकारने कडक कारवाई करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
 
डॉ. सुनील भंडगे, पुणे
 
अनधिकृत शाळांवर कारवाई करा
 
राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यात अनधिकृतपणे चालू असणार्‍या १३०० शाळांची पडताळणी केली असता त्यातील ८०० हून अधिक शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामध्ये ५१ शाळा केवळ पुण्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने पुणे महानगरपालिका आणि जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या या ५१ शाळांवर बंदीची कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात १०० हून अधिक बोगस शाळा असाव्यात, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे अनुमान आहे. विद्येच्या माहेरघरात शिक्षण व्यवस्थेची असलेली ही स्थिती पाहता या अनधिकृत शाळांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न पडतो. मुलांना शालेय शिक्षणासोबत नैतिक मूल्यांचे शिक्षण शाळांतून मिळत असते; मात्र वरील आकडे पाहता शालेय शिक्षण देणार्‍या शाळाच भ्रष्टाचारातून उभ्या राहिल्या असल्याचे चित्र दिसून येते. या अनधिकृत संस्थांना पाठबळ देणारे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी होणार का? अनधिकृत शाळांना टाळे लावले गेल्याने शाळांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे दायित्व कोणाचे? 
 
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 

Related Articles